|
मंत्रमंदिर |
महाराजांचा जन्म ज्या कार्यासाठी भुलोकीं झाला, तो वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून शरणांगत जीवमात्राचे कल्याण करण्यास्तवच. अवघ्या आयुष्याचेच अर्घ्य अर्पित त्यांनी ते कळसाला नेले ते दिव्यभव्य परम पवित्र रमणीय मंत्रमंदिराची निर्मिती करुनच. जीवनाचा अत्यादभूत साक्षात्कारी कार्याचा तो एक विलक्षण नवलविशेष होय. |
|
|
वारकरी जीवनाचा ‘ रामकृष्णहरी ’ या महामंत्राचे अत्यंत देखणे मूर्त स्वरुप - मंत्रमंदिर |
महाराष्टाच्या परम पवित्र भूमीत लोणावळ्यापासून अवघ्या आठ किलोमीटरच्या अंतरावरील दुधिवरे गावीं, श्री संत तुकाराम महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या लोहगडाच्या पायथ्याशी, पवनेच्या जलधारांच्या कवेत, शांत स्तब्ध डोंगराच्या कुशीत, गर्द हिरवाईने वेढलेल्या वनराजीत, धुक्याची तलम फिक्कट निळीपांढरी रेशमी शाल लपेटलेले ते बावीस एकरातील विशाल चैतन्यधाम.
‘ रामकृष्णहरी ’ या महामंत्राचे, देव, संत आणि भक्त या त्रिवेणीवर साकारलेले हे मंदिर, बाबा महाराजांच्या दिव्य दृष्टिला जाणवलेल्या अत्यादभूत साक्षात्काराचा सगुणसाकार अविष्कार होय.ही अप्रतिम कलाकृती युगानुयुगे अजरामर आणि चिरंतन दिगंत यश कीर्ति दुमदुमवित ठेवणारी अशी अलौकिक आहे.
लोखंड विरहित बांधकाम, भव्य प्रचंड कमानी, वारकरी भगव्या रंगाशी जवळीक साधणा-या धोलपुरी दगडाच्या राजस्थानी कलाकुसरीने सालंकृत या देवालयाची पाच मुख्य शिखरांनी नटलेली, समुद्रसपाटीपासुन दीडशे फुटापेक्षाही अधिक उंची असवेली, आपल्या हातांच्याही कवेत न मावणा-या महास्तंभांनी पेललेली, नक्षीदार घुमट,भारतीय चित्रशैलीच्या नाजुक कलाकुसरीने सजलेली, संतजीवनचरित्राच्या अनुकरणीय कथाचित्रांच्या म्युरल्सने रंगलेली, गभीर न् परा शांतीने भारलेली संगमरवरी शुभ्रतेनीं आवृत्त झालेली, ही देवालयाची शुभ वास्तु, |
|
देवालय बांधिले सुंदर । कलाकुसरी चित्रकार ।।
मुख्य पहावा तो कळस । पिका आला ब्रह्मरस ।। |
|
गणपती, मारुती, रामपंचायतन, विठठलरुक्मिणी, राधाकृष्ण, या देवांच्या आणि ज्ञानोबाराया, नामदेवराया, एकनाथ महाराज, आणि ८१ फुटांच्या ऊंचीवर विराजमान झालेली वीणा घेवून कीर्तनाला सज्ज असलेले ऊभे श्री जगदगुरु तुकाराम महाराज तर सातारकर संप्रदायाचे निर्माते श्री दादा महाराज या सर्वच संगमरवरी भव्य मूर्तिच्या विलोभनीयतेने विनटलेले हे मंदिर सर्वानीच पुनः पुनः पाहावे असे आहे.
चार खांबावर उभारलेले मंदिर चातृवर्णाने एकसंघ असलेल्या समाजाच्या एकीचे दर्शन घङविणारे आहे. आतील शिल्पे संतकथा सांगणारी आहेत. मदिराच्या प्रवेशानंतर लाभणारी शांती, प्रसन्नता, पवित्रता अवर्णनीय आहे. अनुपम सुखानुभुती निशब्द करीत मौनात जीवशीव ऐक्यप्रचिती देते. ते सुख काय देवु हाती वाचेचिया, या माऊलींच्या वचनाचा अर्थ चैतन्यधामाच्या दर्शनाने सर्वानांच प्राप्त होतो. हीच बाबामहाराजांच्या कार्याची सफल फलश्रुती आहे.
निळया अथाव आकाशाच्या मंङपाखाली, निशब्द लोहगङच्या पायथ्याशी, पवनेच्या पावन जललहरीच्या शीतल वायुलहरीस्पर्शात लपेटत, हिरवाईने नटलेल्या चैतन्यधामाच्या चैतन्याच्या प्रसन्न पायी माय बाबामहाराजांच्या स्वगीर्य स्वरांच्या सुरेल रागदारीत स्वताःला झोकुन देत रामकृष्णहरी या वारकरी बीज महा नाममंत्रात विरुन पहा तर खरे ।
राहण्यासाठी रामनिवास, कृष्णनिवास, प्रेमनिवास आणि संतनिवास अशा सुंदर सर्वसोयीयुक्त इमारती आहेत. अन्नदानाचा यज्ञ रोजच चालु आहे. चैतन्याधाम मध्ये मंत्रमंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या भाविक भक्तांच्या निवासासाठी self contend ७३ रूम्स उपलब्ध आहे. आगावू बुकिंगने राहण्याची भोजनाची व्यवस्था होते. |
|
|
|
संतकृपा झाली । इमारत फळा आली ।।
ज्ञानदेवे रचिला पाया । उभारले देवालया ।।
नामा तयाचा किंकर । तेणे केला हा विस्तार ।।
जनार्दन एकनाथ । खांब दिला भागवत ।।
तुका झालासे कळस । भजन करा सावकाश ।।
|
|
या अभंगाच्या दर्शनासाठी एकदातरी चैतन्यधामाला जावेच जावे. पुढे जातच रहाल हा विश्वास. |
|
|
पत्ताः- |
मंत्रमंदिर चैतन्यधाम,
श्रीक्षेत्र दुधिवरे, ता. मावळ जि. पुणे .
लोहगडच्या पायथ्याशी, पवना धारणा जवळ |
|
|
|