श्री सदगुरु दादा महाराजांचे सर्वात धाकटे चिरंजीव ज्ञानेश्वर तथा भाऊ महाराज आणि लक्ष्मीबाई या भाग्यवंत पिता आणि माता यांचे उदरीं कौसल्या तथा माईंचा जन्म दिनांक १ आक्टोंबर १९३४ ला झाला. सुपुत्र निळकंठ म्हणजे आपल्या सर्वांचे माय बाबा महाराज. त्यांचा जन्म सातारा येथे दिनांक ५ फेब्रुवारी १९३६ साली झाला. माघ शुध्द त्रयोदशी शके १८१८ हा दिवस बाबा महाराजांच्या जन्मांमुळे अविस्मरणीय ठरला. अनंत जन्माच्या पुण्याईने माता लक्ष्मीबाई आणि पिता ज्ञानेश्वर यांच्या उदरी महान भगवदभक्त बाबा महाराज जन्मला आले. त्यानीं आपल्या कर्तृत्वाने सातारकर कुळाला अधिक उज्वल केले.

सदगुरु दादा महाराज यांचे तर या नातवावर विलक्षण प्रेम. त्यांचा प्रेमबोध बाबामहाराजांच्या रुपानेच भविष्यात समाजाला सदैव लाभतच राहिला आहे. आणि ही भाग्यशाली अजोबा- नातवाची प्रेमजोडी परत एकदा आजोबा बाबामहाराज आणि नातु चिन्मय महाराजच्या रुपाने परावर्तित झाली.

अजोबा आणि नातु बाबा महाराज

अजोबा आणि नातु चिन्मय

परिवार

२४ मार्च सन १९५४ साली देशमुख दिंडीचे वीणेकरी श्री पांडुरंग जाधव यांच्या सुलक्षणी नात दुर्गा हिने एका गोरज मुहूर्तावर सकलसौभाग्यसंपन्न रुक्मिणी बनून महाराजांच्या जीवनात लक्ष्मीच्या पाऊलांनीं पदार्पण केले. त्यांच्या संसारवेलीवर सम १९५८ ला भगवती, १९६२ ला रासेश्वरी, सन १९६३ ला चैतन्य अशी फुले ऊमलली. एक भाग्यशाली संसार विश्वकल्याणार्थ अवतीर्ण झाला.

श्री चैतन्य महाराज,सातारकर संत परंपरेतील एक छोटीशी कळी। न उमलता अकस्मात माऊलींच्या चरणीं गळून पडली. त्याना ज्ञानेश्वरीचे चार अध्याय पाठ होते. लहानपणापासुनच महाराजांचे मागे कीर्तनांत ऊत्कृष्ट लयबध्द टाळ वाजवित असत. वारीच्या वाटेने दिंडीत असले की सर्व टाळकरी मंडळी एकदम खूष असत. त्यांच्या नाचण्यातही बाबा महाराजांसारखा डौल होता. महाराजांच्या कीर्तनात माईक सारखा करता करता ते माईकरुपच झाले. चैतन्य जसा त्यांचा आत्मा होता, तसेच त्यांच्या कार्यक्रमाचा ‘‘ माईक व आवाज ’’ हा आत्माच होय. म्हणूनच त्यांना माईक सिस्टिम कीर्तनासाठी ऊत्तम लागते. मला वाटते,त्यांच्यासमोर माईक नसून चैतन्यच उभा असतो व ते त्याच्या माध्यमातून बोलत असतात.

महाराजांच्या जीवनात, दुधात साखर विरघाळावी तशा समरस झालेल्या त्यांच्या कांता सौ. रुक्मिणी यासुध्दा सर्वांच्या आईसाहेब बनून गेल्या.सावलीसारखी महाराजांच्या कार्यात सदैव सोबत राहून जी सेवा, सहकार्य करीत आहेत ते खरोखरच अद्भूत असे कार्य आहे.

पन्नास वर्षांच्या अपूर्व आनंदाच्या संसारपूर्ति नंतर परत दोघांच्या विवाहासोहळ्याचे भाग्यदेखील महाराजांचे पदरी घालून देवाने स्वताःलाच धन्य मानले असावे.

महाराजांच्या सा-या अलौकिक जीवनाचा सोनेरी कलश, तथा परिपूर्णता म्हणजे या सर्वाबरोबरच महाराजांच्या मोठया भगिनी कौसल्या याही अविवाहित राहून या परिवाराच्या विश्वकल्याणकार्यांत मोठया बहिणीची भुमिका निभावत, आजही सदैव निशब्द सक्रीय समर्थ साथच करीत असतात. माई आणि महाराज ही जोड आजही चिन्मय आणि दर्शनी रुपे परावर्तित झाल्यासारखी आज तरी वाटत आहे.

सर्वच नात्यांच्या अलौकिक प्रेमाचे दर्शन म्हणजेच बाबामहाराजांचे जीवन हेच खरे वास्तव होय.

त्रिवेणी